न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आंद्रा योजनेचे पाणी तातडीने सुरु करा, कचरा संकलनासाठी मिळकतींना लावलेला उपयोग शुल्क तातडीने रद्द करा, नागरिकांना आरोग्य सोयी-सुविधा देण्यासाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ ची संख्या वाढवा, यासह भोसरी विधानसभेतील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशा सुचना शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या.
शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी विधानसभेतील प्रलंबित प्रश्न आणि विविध विकास कामाचा आढावा गुरुवार (दि. ४ मे) घेण्यात आला. याप्रसंगी मा. खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद कामगार नेते तथा शिवसेना उपनेते, संभाजी शिरसाठ उपजिल्हा प्रमुख, भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे,मनिषताई परांडे महिला भोसरी विधानसभा प्रमुख, संघटक बळीराम जाधव, युवा उपशहर प्रमुख रोहित जगताप,युवा उपशहर प्रमुख युवा दत्ता औरळे , दिघी भोसरी चऱ्होली विभाग प्रमुख किशोर सवाई, युवा संघटक अभिजित लांडगे, आशिष गौड, युवा समन्व्यक प्रदीप बालघरे वाहतूक आघाडी उप प्रमुख समीर नदाफ, व्यापारी आघाडी प्रमुख जमाल अहमद चौधरी, भोसरी विधानसभा समन्वयक गौरी शेलार, रुपीनगर शाखा प्रमुख राहुल पिंगळे, विभाग प्रमुख दिनकर जाधव आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आढावा बैठकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये आंद्रा, भामा-आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प, चिखली जलशुध्दीकरण केंद्र, पर्यावरणाचे इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प, कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह बायोमायनिंग कामे, यासह स्थापत्य विषय कामे, रस्त्यांची कामे, मोशी रुग्णालय, मोशी सफारी पार्क, आतंरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, यासह अन्य विविध प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी नागरिकांना ‘आपला दवाखाना’मध्ये चांगल्या सोयी-सुविध उपलब्ध करा, कचरा संकलनासाठी उपयोगकर आकारलेले शुल्क रद्द करा, आंद्रा, भामा-आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर शहरातील नागरिकांना उपलब्ध करावे, पावसाळ्याच्या तोंडावर रखडलेल्या रस्त्याची कामे पुर्ण करा, चिखली, रुपीनगर, दिघीत कृत्रिम पाणी टंचाई दूर करा, वायसीएमचा नेत्र विभाग तातडीने मासूळकर काॅलनीतील नेत्र रुग्णालयात हलवून पुर्ण क्षमतेने सुरु करा. इंद्रायणी नदीतील जलपर्णी तातडीने काढून नदी स्वच्छ करा. अनधिकृत होर्डिग्ज तातडीने काढून टाका. चिखली, मोशी, च-होली, डूडुळगाव परिसरातील नवीन रस्ते तातडीने पुर्ण करा. शहराची लोकसंख्या वाढल्याने बर्निंग वाॅर्ड तयार करा. अण्णासाहेब मगर स्टेडियम काम लवकर करा. नाशिक फाटा ते मोशी टोलनाका रस्त्याचा डीपीआर काम लवकर पुर्ण करुन काम तातडीने सुरु करा. यासह प्रलंबित विविध कामे पुर्ण करण्यासाठी आयुक्तांना सुचना करण्यात आल्या. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व प्रलंबित प्रश्न आणि विविध विकास कामांबाबत योग्य ते लक्ष घालून मार्गी लावण्यात येतील, त्याबाबत संबंधित अधिका-यांना आदेश देवून प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जातील, असेही आश्वासन आढळराव-पाटील यांना दिले.
वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस आयुक्तांशी चर्चा…
भोसरी, चाकण, तळेगावासह एमआयडीसी परिसरात वाढलेली गुंडगिरी, वाहतूक समस्या, अल्पवयीन गुन्हेगाराचा प्रश्न यासह विविध प्रश्नाबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी चर्चा केली. याशिवाय वाहतूक समस्या सोडविणे गरजेचे आहे. पोलिस कर्मचा-यांना मदतीला वाॅर्डन देवून चौकाचौकात वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्रात वळू लागली आहेत. त्यामुळे पोलिसांना कायद्याचा धाक दाखवून बालगुन्हेगारीवर उपाययोजना कराव्यात. कोयता गॅंगची वाढलेली दहशत मोडून काढा, यासह अनेक प्रश्नांवर तोडगा काढावा, अशीही चर्चा करण्यात आली.















