- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवा वॉरियर्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती घराघरात जाऊन सांगा. गाफील राहू नका, जोमाने कामाला लागा, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
निगडी प्राधिकरण येथील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांच्या माध्यमातून युवा वॉरियर्सच्या १४ शाखांचे रिमोटद्वारे लाईव्ह स्क्रिनवर त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, युवा वॉरियर्सच्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, विधान परिषद आमदार उमा खापरे,भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, तुषार हिंगे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तेजस्विनी कदम, युवा मोर्चा प्रदेश सचिव अमृत मारणे,सुजित थिटे,अजित कुलथे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकेत चोंधे, आदी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवकांची दुचाकी रॅली काढण्यात आली.
बावनकुळे म्हणाले, भारताचे भविष्य हे युवा वर्गावर अवलंबून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युवा वर्गाची एकजुट तयार करुन 2035 चा भारत हा विश्वगुरु बनविण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. स्वतंत्र्यानंतर काँग्रेसने 65 वर्षात देश 15 व्या क्रमांकावर नेहून ठेवला. जनतेच्या एका मताने देशाची सुत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती दिली. आता भारतावर दिडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्लडला देखील मागे टाकत भारताने जगातील विकसित देशाच्या यादीमध्ये पाचवे स्थान पक्के केले आहे.
जगातील काही देशांनी जागतिक सर्वेक्षण करुन मोदींना जगातील ताकदवान नेते म्हणून जाहीर केले आहे. आता मोदींनी नवीन शिक्षण प्रणाली आणली आहे. त्याद्वारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील होण्यासाठी भाषेची मर्यादा राहणार नाही. मराठीतून शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकिल होता येते. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच, महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवा वॉरियर्स व सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन देखील त्यांनी कार्यक्रमात केले.