न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना १५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. दरम्यान, आतापर्यंत जवळपास ४९ हजार ३०० पालकांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन प्रकरणे १५ मेपर्यंत निकाली काढावीत. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.


















