न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- शहरातील अधिकृत होर्डिंगचे परवाना नूतनीकरण आणि अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिका आकाशचिन्ह परवाना विभागाने सर्वेक्षण करून १७६ होर्डींगधारकांना नोटीस दिली होती. त्यापैकी दोन दिवसांपूर्वी अवघ्या २० होर्डींगसाठी अर्ज आले असून त्यापोटी तब्बल ४० लाख नऊ हजार ६९३ रुपयांचे शुल्क जमा झाले होते.
किवळे येथे १७ एप्रिल रोजी अनधिकृत होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिटसह राज्य सरकारच्या जाहिरात धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्याअनुषंगाने जागा मालक, सक्षम अधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र व महापालिकेच्या पॅनलवरील संरचना अभियंत्याचे संरचना मजबुतीचे (स्थिरता) प्रमाणपत्र नसल्यास अनधिकृत गृहित धरून होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे. त्यासाठी येणारा संपूर्ण खर्च जाहिरातदारांकडून वसूल केला जाणार आहे. अधिकृत होर्डिंगचे परवाना नूतनीकरण आणि अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
‘‘परवाना शुल्क भरण्यासाठी १७६ होर्डिंगधारकांना नोटीस दिली होती. त्यांच्याकडून चार कोटी नऊ लाख १३ हजार ४६ रुपये येणे होते. त्यापैकी २० होर्डींगचे ४० लाख नऊ हजार ६९३ रुपये शुल्क जमा झाले आहे. उर्वरित होर्डिंगधारकांबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.’’
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग, महापालिका…


















