न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये १ हजार झाडांपैकी ३०० विदेशी झाडे तोडावी लागतील. तर ३५० झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे ६५० झाडांचा जीव गेल्यानंतर मुळा नदी स्वच्छ व सुंदर होणार आहे.
शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. त्यातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पालिका स्वतः राबवित आहे. मुळा नदीचा प्रकल्प पुणे पालिका त्यांच्या हद्दीतील व पिंपरी पालिका शहराच्या हद्दीत प्रकल्प राबविणार आहे. पालिका हद्दीत वाकड बायपास ते बोपखेल असे एकूण १४.४० किलोमीटर असे मुळा नदीचे एका बाजूचे काठ आहे. त्यात पिंपळे निलख, दापोडी, बोपखेल येथे संरक्षण विभागाचा भाग आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे ८.८० किलोमीटर अंतराच्या या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यासाठी २७६ कोटी ५४ लाख खर्च होणार आहे. हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
काठावर अनेक जुनी व दुर्मीळ झाडे व वनस्पती आहेत. सर्व झाडांची गणना करण्यात आली आहे. सन २०१८ ला झालेल्या वृक्ष गणनेत या काठावर विविध जातींची एकूण १ हजार लहान व मोठी झाडे आहेत. त्यातील सुमारे ३०० झाडे ही विदेशी आहेत. ती काढून देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच कामास बाधित होणारी सुमारे ३५० झाडे काढून त्याच्या काठावरच इतरत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. प्रकल्पासाठी पालिका २ हजार ७०० नवी झाडे लावणार आहे. ती सर्व देशी जातीची झाडे असणार आहेत.
मुळा नदी प्रकल्पात नदी काठावर पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. ते मार्ग तयार करताना ज्या ठिकाणी झाडे आहेत त्या ठिकाणाहून मार्ग वळवण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच विदेशी ३०० झाडे काढणार आहेत. तर ३५० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २ हजार ७०० नवीन देशी झाडे लावणार आहे
३०० विदेशी झाडे काढण्यात येणार आहेत, तर ३५० झाडे काढून त्यांचे काठावरच पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पदपथ व मार्ग तयार करताना झाडमध्ये आल्यास बाजूने मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे कामासाठी झाडे तोडण्याची गरज नाही.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग…
















