न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार निवडणुका घ्यायला घाबरतंय असा आरोप सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून होत आहे. अशातच विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर महापालिकेच्या निवडणुका आत्ता न घेता थेट २०२४ नंतर घेतल्या जातील.
याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, मी आधीही सांगितलंय महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे रखडल्या आहेत. त्यांच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील याचिकांमुळे निवडणुकांना विलंब होत आहे. या निवडणुका भाजपामुळे थांबलेल्या नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतल्या तर कधीही राज्यात निवडणुका लागू शकतात. वर्षभरापासून या निवडणुका लागल्या नाहीत कारण राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आणि हाय कोर्टात ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी नियमबाह्य जागा वाढवल्या, नगसेवकांच्या जागा वाढवल्या, प्रभाग वाढवले आहेत. जनगणनेची आकडेवारी न येताच त्यांनी वॉर्ड वाढवले, ते सरकारने रद्द केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोर्टात गेली. त्यामुळे या निवडणुका न होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार आहे.


















