- आ. महेश लांडगे यांच्या मनातलं आज ओठावर आलचं..
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली हटके मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- चिंचवडसह लगतच्या भागाला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते आकुर्डी येथे बोलत होते.
विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर आले होते. लांडगे म्हणाले शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तायला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे.
तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि ‘शिवनेरी’ हा नवा जिल्हा करावा व पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र तालुका म्हणून निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज केली. राजकीय विभाजन नाही केवळ जिल्ह्याचे विभाजन म्हटलं आहे. उगाच वेगळ्या बातम्या चालवू नका असंही लांडगे म्हणाले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अण्णा बनसोडे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.


















