- शाळेतील विद्यार्थ्यांसह खेळाडूंना घेता येणार घोडेस्वारीचे प्रशिक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विद्यार्थी-खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण ॲकॅडमी सुरू करण्यात आल्या आहेत. आता साहसी प्रकारातील घोडेस्वारी (हॉर्स रायडिंग) या खेळाचे प्रशिक्षण केंद्र जाधववाडी, चिखली येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका व खासगी शाळेतून अनेक विद्यार्थी खेळाडू घोडेस्वारीत तरबेज होणार आहेत.
पिंपरी -चिंचवड औद्योगिकनगरीचे ‘स्पोर्ट्स हब’मध्ये रूपांतर करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यादृष्टीने विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पालिकेने सुरू केले आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रशिक्षण व अनुभवी खेळाडू हे महापालिका व खासगी शाळेतील तसेच, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यातून अनेक खेळाडू देशपातळीवर चमकत आहेत.
पालिकेची थेरगाव येथील वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी राज्यात प्रसिद्ध आहे. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे हॉकीचे प्रशिक्षण केंद्र, शहरात विविध ठिकाणच्या कोर्टवर लॉन टेनिसचे प्रशिक्षण आणि दापोडीतील सीएमई येथे रोईंग खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भोसरीतील कुस्ती संकुलात कुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, धनुर्विद्या व रायफल शूटींगचे प्रशिक्षण केंद्र शहरात सुरू करण्यात आले आहे.
आता, घोडेस्वारी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी जाधववाडी येथील गट क्रमांक ७२/१ येथील मैदानावर पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र थेरगाव येथील कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान ३ वर्षे चालविणार आहे. प्रतिष्ठानने ठरविलेल्या शुल्कानुसार एकूण संख्येच्या ६० टक्के खेळाडूंना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्याची मुभा आहे. उर्वरित ४० टक्के खेळाडू हे शहरातील शाळेतील विद्यार्थी, खेळाडू असतील. क्रीडा शिक्षकांशी समन्वय साधून १८ वर्षांखालील पात्र मुले व मुलींना मोफत प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. हे केंद्र तीन वर्षे चालविण्यात येणार आहे. तसा पालिका व प्रतिष्ठान याचा करारनामा केला जाणार आहे.
घोडेस्वारी या खेळास ऑलिम्पिक महासंघाची मान्यता आहे. त्यासाठी देशात इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडिया काम करीत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने बुरुजवाडी, शिक्रापूर येथे हॉर्स रायडिंग अॅकॅडमी सुरू आहे. त्या पद्धतीने जाधववाडी केंद्रात शहरातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून राष्ट्रीय खेळाडू तयार होणार आहेत, असा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे.















