- पोलीस आयुक्तालयाकडून बीट मार्शलला दिले जातेय शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी दाखल होणाऱ्या बीट मार्शलला नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची कल्पना नसते. त्यामुळे समोरची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी केवळ काठीबरोबरच बीट मार्शलला सोबत पिस्टलदेखील दिले जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाकडून सर्व बीट मार्शलला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून बीट मार्शल काम करतात. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करणे, ११२ वर तक्रार आल्यास लवकरात लवकर घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे, शिवाय अनेकदा आरोपींना अटक करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
बीट मार्शल पथकाकडून पेट्रोलिंगद्वारे शालेय परिसर, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणांसह निमनुष्य जागी हदीतील वेळोवेळी तपासणी केली जाते. दुचाकीवरील पेट्रोलिंगमुळे स्थानिक परिसरातील वादविवाद, भांडणे, दादागिरीचे प्रकारही कमी होण्यास मदत होते. प्रत्येक पोलीस स्टेशनला पेट्रोलिंगकरिता एक दुचाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे व संवेदनशीलता यामुळे या पोलीस स्टेशनला दोन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावरून नियमितपणे पेट्रोलिंग केले जात आहे.
कुठलीही घटना घडल्यास तिथे तत्काळ पोलिस असावे या दृष्टीने बीट मार्शलची संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार सध्या बीट मार्शलचा प्रतिसाद वेळ हा कुठल्याही घटनास्थळी पोहचण्याचा सरासरी दहा मिनिटांचा आहे. ही वेळ जवळपास सात मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न पोलिस विभागाकडून केला जात आहे. त्यासाठी पोलिस विभागाकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. तर ग्रामीण भागातील मोठी हद्द असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भागात घटनस्थळी बीट मार्शल पोहचण्यास पंधरा मिनिटांचा अवधी लागत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.















