न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २३ मार्च) :- शिरूर लोकसभेची उमेदवारी खासदार आढळराव पाटील यांना जाहीर झालेली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.
युतीचे काहीच भविष्य दिसत नव्हते. त्यामुळे सेनेतीलच खासदार आढळराव यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यावर सडकून टीका केली होती. आता युती झाली आहे त्यामुळे आढळरावांना आता भोसरीतील मतांची आवश्यक आहे.
खासदार आढळराव यांच्या उमेद्वारीची घोषणा होताच भोसरी येथे भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी सभापती सीमा सावळे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह भोसरीतील सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.
भोसरीतील लांडगे समर्थक नगरसेवकांनी खासदार आढळराव यांच्या प्रत्येक आरोपाचा उहापोह केला. भोसरीतील प्रत्येक प्रकल्पास खासदार आढळराव यांनी विरोध केला होता. सुलभा उबाळे यांनी देखील सातत्याने आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले. खोटेनाटे आरोप केले. आता त्यांचा प्रचार कसा करायचा? लोकांसमोर त्यांच्यासाठी मत मागायला गेल्यावर लोक प्रश्न विचारतील? आढळराव यांनी अगोदर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत. त्यानंतरच काय ते पाहू, अशी एकसुरी मागणी आमदार लांडगे समर्थकांनी यावेळी केली. आमदार महेश लांडगे यांनी ‘भाजप-शिवसेनीची युती झाली आहे. सर्वांनी युतीचा धर्म पाळावा’ असे आवाहन केले. निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी अलीकडे भाजप-शिवसेना यांची युती झाली. त्याआधी युती होईल की नाही याचे संकेत भल्याभल्यांना सांगता येत नव्हते. त्यामुळे आढळरावांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.















