न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिल्ली (दि. २३ मार्च) :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली आणि दुसरी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आज रात्री उशिरा (२३ मार्च) रोजी तिसरी यादीही जाहीर केली.
पहिल्या यादीत भाजपने १८२ उमेदवारांची घोषणा केली, तर दुसऱ्या यादीत फक्त एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती. तिसऱ्या यादीत भाजपने ३६ उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यातून भाजपचे वरीष्ठ नेते गिरीष बापट यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपने बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीत जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर येथील उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीतून भारती पवार, पुण्यातून भाजपचे वरीष्ठ नेते गिरीष बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी हे उमेदवार भाजपकडून लढणार आहेत.











