न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- औरंगाबाद, उस्मानाबाद, आणि अहमदनगरचे नामांतर करण्यात आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडच्या नामांतराच्या मागणीने जोर धरला आहे. शहरातील एका संस्थेने ही नामांतराची मागणी केली आहे.
औरंगाबाद आणि नगरचे नामांतर सरकार करू शकते तर मग पिंपरी-चिंचवडचे का नाही? असा सवाल या संघटनेने केला आहे. शहरात जवळपास १०० हून अधिक ठिकाणी पिंपरी-चिंचवडचा जिजाऊ नगर हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याच्या चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा दैनिकात बातम्या देखील छापून आल्या. पण, स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होते आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ही मागणी केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नामांतराचा निर्णय सरकार घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ऐन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका नामांतराच्या मागणीची भर पडली आहे.












