- मैलामिश्रित, रसायनयुक्त पाणी थेट नदीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदी पात्रामध्ये दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे होणारे मिश्रण आणि वाढत्या जलपर्णीमुळे इंद्रायणी प्रदूषित होत आहे. मागील काही दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्रात मृत मासे दिसून येत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या दूषित पाणी आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूगाव येथील स्मशानभूमी आणि पवित्र इंद्रायणी नदी काठचा विकासासाठी लाखो रुपये खर्चून घाट बांधण्यात आला आहे. घाटावरील आकर्षक मेघडंबरी, वृक्षारोपण, हायमास्क, सुरू असलेली बोटींग यामुळे परिसर पर्यटन स्थळ बनले आहे. वर्षातून तीन वेळा भरणाऱ्या मोठ्या यात्रा तसेच श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असल्याने प्रतिदिन हजारो वारकरी भाविक संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ तर पर्यटक पर्यटनासाठी तीर्थक्षेत्र देहूत येत असतात. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी आणि नदी काठालगत तीर्थक्षेत्र असणारे भारतातील तीर्थक्षेत्र देहू हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा या पवित्र इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली असून ती तरल्याचा भाव वारकऱ्यांमध्ये असल्याने या नदीला मोठे महत्त्व आहे. काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद खाण्यासाठी गंधर्व, किन्नर यांनी मस्य रूपामध्ये अवतार घेतला असल्याची अख्यायिका आहे. या माशांना देवमासे (खवली मासे) असेही म्हणतात. हे मासे देहू वगळता इतरत्र कोठेही आढळून येत नसल्याचे सांगण्यात येते. या माशांचा गाथेमध्ये ही उल्लेख आढळून येत आहे. ब्रिटिश काळात(स्वातंत्र्यापूर्वी) या माशांची मासेमारी करण्यास ब्रिटिशांनी बंदी घातली होती. या माशांना पाहण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून नागरिक येत असतात. दर्शनार्थ आलेले भाविकच नव्हे तर पर्यटकही पवित्र इंद्रायणी नदी पात्रातील जल तीर्थ म्हणून घेतात.
दशक्रियानंतर निर्माल्य व साहित्य नदीत टाकतात…
इंद्रायणी नदी घाटावर कपडे धुण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रामध्ये मृत व्यक्तींचे कपडे किंवा अनावश्यक असलेले टाकणे, दशक्रिया विधीनंतर निर्माल्य तसेच मडकी, पूजेनंतर उर्वरित साहित्य नदीपात्रात टाकणे, कंपन्याचे केमिकल युक्त दूषित व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यात येते. धुतलेल्या कपडयांमुळे साबणाचे, केमिकलचे पाणी, वाढती जलपर्णी तसेच बेकायदेशीर वाळू उपसाने दूषित होणारे पाणी अशा अनेक कारणांमुळे पवित्र इंद्रायणी नदी गटार गंगा होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांचे ही आरोग्य धोक्यात येत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मैलामिश्रित सांडपाणी आणि जलपर्णीमुळे माशांना जलचरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून नदीपात्रातील माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.
मैलामिश्रित, रसायनयुक्त पाणी थेट नदीत..
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूत मैलामिश्रित सांडपाण्यासाठी भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गटारांच्या दूषित पाणी तसेच अनेक कंपन्यांचे केमिकलयुक्त दूषित पाणी या वाहन्यांना जोडण्यात आल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक दिवसांपासून देहूतील मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी चेंबरमधून मैलामिश्रित दूषित सांडपाणी तर नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या वाहिन्या व फुटलेल्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. वाढत्या जलपर्णीकडे दुर्लक्ष झाल्याने जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पात्रता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दूषित पाण्याने नागरिकांना त्रास होऊ लागल्याने आरो फिल्टर पाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.












