- पीओपीपासुन मुर्ती बनविण्यावर बंदी; अन्यथा होणार कारवाई...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. सन २०२१-२२ मध्ये देखील मनपा मार्फत गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक मूर्ती व पूजा साहित्यांचा अवलंब करण्याचे शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच मनपा कार्यक्षेत्रामध्ये मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपी पासुन मुर्ती बनविण्यावर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले असुन मनपा कार्यक्षेत्रात केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत कळविले आहे
तरी या परिपत्रकाद्वारे मूर्ती तयार करणाऱ्या सर्व कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना सुचित करण्यात येते की त्यांनी केवळ पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणा-या मातीच्या मूर्तींची निर्मिती करावी. मे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मुर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक असुन नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना मनपा कार्यक्षेत्रात मुर्ती विक्री स्टॉलला मनपामार्फत परवानगी देणेत येणार नाही तसेच विनपरवाना अनधिकृतपणे मुर्ती विक्री कऱणा-या दुकानदार / व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत कायदेशिर कारवाई करणेत येईल.
मूर्ती तयार करणाऱ्या अथवा विक्री करणा-या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांनी याबाबतची परवानगी घेण्याकरीता मनपाच्या उद्योगधंदा व परवाना विभागाकडे संपर्क साधुन परवानगी घ्यावी व त्याची १ प्रत पर्यावरण पुरक मुर्ती विक्रीच्या दुकान अथवा स्टॉलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी केवळ पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणा-या पर्यावरण पूरक मुर्ती व सजावटीचे पूजा साहित्य वापरून गणेशोत्सव /नवरात्रोत्सव यांसारखे उत्सव साजरे करावेत.













