- राज्य निवडणूक आयोग तयारीला: निवडणुकासंदर्भात काढले परिपत्रक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 07 जुलै 2023) :- मागील जवळपास २ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात एक परित्रपत्रक काढले आहे. यामध्ये मतदार यादीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा उल्लेख निवडणूक आयोगाने जारी केलेल्या राजपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात २३ महानगरपालिका तसेच २५ जिल्हा परिषदा आणि एकूण २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका जवळपास २ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. याशिवाय ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून सुनावण्या सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे.
दरम्यान अजित पवार यांचा राष्ट्रवादीतील गट सत्तेत सहभागी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठ्या घडामोडी दिसून येणार आहेत














