- नियमानुसारच होर्डिंग उभारण्यास यापुढे परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंगधारकांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले होते. त्यानुसार अधिकृत फलक असलेल्या १ हजार १३५ व न्यायालयीन वादातील २८१ अशा १ हजार ४१६ होर्डिंगधारकांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच यापुढे नियमानुसार होर्डिंग नसलेल्या होर्डिंगचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिला आहे.
किवळे येथे (दि. १७) एप्रिल रोजी अनधिकृत होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अनधिकृत जाहिरात फलक व अधिकृत फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट, राज्य सरकारचे जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यासह अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी आयुक्त सिंह यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. शहरात न्यायालयात प्रलंबित असलेल्या ४३३ होर्डिंग व्यतिरिक्त ९१ नव्याने अनधिकृत होर्डिंग आढळून आले होते. हे सर्व होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, न्यायालयात असलेल्या २५७ होर्डिंगधारकांनी परवाना शुल्क म्हणून ३ कोटी ९७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यापुढील काळात होर्डिंग संदर्भात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या ९ मे २०२२ च्या धोरणाची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विभागाच्या मार्फत शहरातील प्रत्येक होर्डिंगची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या धोरणानुसार नसलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने शहरातील सर्व होर्डिंगधारकांना नव्याने अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अधिकृत असलेले ८०७, न्यायालयीन प्रकरणातील १८४ जणांनी नूतनीकरणासाठी तर नवीन होडिंगसाठी ५४ अशा १ हजार ४५ जणांनी अर्ज केले आहेत. होर्डिंग उभारण्यासाठी व्यावसायिकांनी अर्ज केले असली तरी नियमानुसारच होर्डिंग उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने सांगण्यात आले.












