न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च) :- राज्यात तापमानातील वाढ कायम असून, एकूण सतरा महत्त्वाच्या शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.










