न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० मार्च) :- भारतीय निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातून या ॲपवर आतापर्यंत ४४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. हे सी-व्हिजिल’ ॲप उत्तमरित्या काम करत असून, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडून प्रथमच हे नावीन्यपूर्ण ॲप देशातील नागरिकांना उपलबध करुन देण्यात आले आहे. या ‘सी-व्हिजील’ ॲपमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. या ॲपचा वापर करणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हॅण्डसेटचा प्रकार, मोबाईल इंटरनेट सेवेची गती (इंटरनेट स्पीड- उदा. ३ जी, ४ जी), मोबाईल नेटवर्क पुरवठादार कंपनी, स्थान निहाय नेटवर्क कव्हरेज आदी घटकांवर इंटरनेट स्पीड अवलंबून असतो. या घटकांमुळे तेथील परिस्थितीनुसार ॲपवर छायाचित्र, चित्रीकरण अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक असू शकतो
तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटात कार्यवाही होत असल्याने हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र, तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरत आहे. कोणताही नागरिक निवडणुकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो.










