न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- महापालिकेने अतिरिक्त आयुक्त (क्रमांक दोन) जितेंद्र वाघ यांच्या जागी विजयकुमार खोराटे यांची प्रतिनियुक्तीवर नियुती केली आहे. खोराटे यांनी शुक्रवार (दि. ७) आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बसून ते कामकाज करीत असून, संबंधित विभागासोबत बैठक घेत आहेत. मात्र, आयुक्त शेखर सिंह हे हजर नसल्याने अद्याप त्यांना अधिकृत पदभार देण्यात आलेला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जितेंद्र वाघ यांची अचानक बदली करून त्यांच्या जागी खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील एक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. शासनाचे खोराटे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (दि. ६) सायंकाळी उशीरा काढले गेले.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी खोराटे यांनी थेट अतिरिक्त आयुक्त दालनाचा ताबा घेत कामकाज सुरू केले. दालनावरील जितेंद्र वाघ यांच्या नावाची पाटीही लगोलग बदलण्यात आली. खोराटे यांनी सोमवारी (दि. १०) आपले कामकाज करीत विभागांच्या विविध संबंधित अधिकार-यांसोबत बैठका घेत चर्चा केली.














