न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १४ जुलै २०२३) :- आषाढी पायी वारी ३३८ वा जगदुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे लाखो वारकरी, भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १३) देहूनगरीत आगमन झाले. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांनी संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी देहूगावात गर्दी केली होती.
सोहळा दुपारी एक वाजता चिंचोली येथे संत तुकाराम महाराज पादुका मंदिरात आरतीसाठी थांबला. त्या ठिकाणी श्री शनैश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने आरती करण्यात आली. या वेळी देहू देवस्थानचे दत्तात्रय जाधव, संतोष जाधव, रमेश जाधव, मिलिंद निघोजकर, प्रसन्न जाधव, विजय घेरडे, दत्तात्रय लांडगे, अरुण जगताप, ओंकार शेटे आदी उपस्थित होते. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने एक हजार किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच, बाबा भालेकर, राजू बुचडे, संतोष शिंदे, संदीप शिंदे यांच्या वतीनेही खिचडीचे वाटप करण्यात आले. एकादशी असल्याने हजारो वारकन्यांनी याचा लाभ घेतला.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अनगडशहा बाबा दर्गा येथील आरती घेऊन सायंकाळी मुख्य मंदिरात आला. या वेळी टाळ-मृदंग आणि हरिनामाचा गजर, माउली तुकारामचा जयघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमून गेली होती. त्या ठिकाणी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घालून हा पालखी सोहळा मुख्य मंदिरातील सभा मंडपात विसावल्यानंतर आरती घेण्यात आली. त्या ठिकाणी देहू देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीकरी, विणेकरी तसेच सेवेकरी यांना श्रीफळ आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोन तास विश्रांती घेण्यात आली. सायंकाळी ७ ते ९ दरम्यान देहूकर महाराजांच्या कीर्तनाने पालखी सोहळ्याची सांगता झाली.