आमदार जगताप यांच्या दिलजमाईबद्दल उत्तर देण्याचे टाळले
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचार यंत्रणेची माहिती देण्यासाठी आज शनिवार (दि. ३०) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक सचिन भोसले, प्रमोद कुटे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, रोमी संधू, उर्मिला काळभोर, सरिता साने आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले की, सकारात्मक मुद्द्यावर निवडणूक लढविणार असून, केलेल्या कामाच्या जोरावर निवडून देखील येणार आहे. मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या उमेद्वारचे डीपोझीट जप्त केले. त्याचीच पुनरावृत्ती यावेळेसही होणार आहे. व्यक्तिगत हेवे-दावे बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य देत युती झाली आहे. शेकापच्या जीवावर राष्ट्रवादी निवडणूक लढवत असून, त्यांची मतदार संघात ताकद कमी आहे. त्यामुळे यावेळेसही मीच मताधिक्य घेऊन पून्हा खासदार होणार असल्याचा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
पत्रकारांनी आमदार जगताप यांच्या दिलजमाईबद्दल प्रश्न उपस्थित केला असता, मोठ्या चतुराईने त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले व आगामी काही दिवसातच याचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.










