- राहुल कलाटे यांची पत्रकार परिषदेस अनुपस्थिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचार यंत्रणेची माहिती देण्यासाठी आज शनिवार (दि. ३०) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची अनुपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. पत्रकारांनी कलाटे यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी कलाटे हे लग्न समारंभासाठी गेले असल्याचे यावेळी सांगितले. परंतु, कलाटे लग्नाला गेलेच नसून, महापालिकेत असल्याचा दावा परिषदेत काहींनी केला होता.
काहीही असो बारणे-कलाटे यांच्यातील वितुष्ट अजूनही संपले नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते. मागील लोकसभा निवडणुकीत कलाटे यांनी खासदार बारणे यांचे प्रामाणिकपणे काम केले होते. त्याबदल्यात बारणे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, कलाटे यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यापासून बारणे व कलाटे यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला व कलाटे यांनी बारणेंपासून फारकत घेतली. त्या घटनेपासून निर्माण झालेला हा दुरावा दूर करण्यात खासदार बारणे मात्र, अपयशी ठरले. ज्याप्रमाणे आपले कट्टर विरोधक लक्ष्मण जगताप यांच्याशी बारणे यांनी दिलजमाई केली, तशीच ते राहुल कलाटे यांच्याशीही करतील काय? असा प्रश्न राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.










