न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- मोबाईल फोन कानाला लावुन मोबाईलवर संभाषण करीत पायी चालत जाणा-या नागरिकांचे महागडे मोबाईल, दुचाकीवरुन धुम स्टाईलने येवून, मोबाईल हिसकावून क्षणार्धात पळून जाणा-या गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे व गुन्हेगारांचा छडा लावण्याबाबत पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखांना आदेशीत केले.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मोबाईल स्नॅचिंग गुन्हे घडणा-या भागातील सीसीटीव्ही कॅमे-याची सातत्याने तपासणी केली. गोपनिय बातमीदाराकरवी माहीती मिळवून कसोशिने शोध घेतला. मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे करणारे गुन्हेगार हे निर्जनस्थळावरून मोबाईल फोनवर संभाषण करीत पायी चालत जातांना नागरिकांच्या पाठीमागुन मोटर सायकलवरुन येवून अचानक मोबाईल हिसकावुन धुम स्टाईलने क्षणार्धात गायब होत असल्याने त्यांच्या दुचाकीचा नंबर व वर्णन मिळुन येत नव्हते. गुन्हे घडणा-या भागात सातत्याने पेट्रोलिंग करुन गोपनिय बातमीदारांना सतर्क करण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना बातमी मिळाली कि, तीन इसम हिरो होंडा कंपनीचे स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम एच १४ बीडब्लु ७०५३ यावरुन संभाजीनगर परिसरात मोबाईल विकायचे आहेत, असे सांगुन संशयितरित्या फिरत आहेत. बातमीप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पथक संभाजीनगर भागात तात्काळ रवाना करून संशयित आरोपींचा शोध घेतला व रोटरी क्लब चौक संभाजीनगर या ठिकाणी सापळा लावून मोटार सायकलवरून फिरणा-या तीन संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.
राज उर्फ नन्या आनंद लष्करे (वय १९ वर्षे रा. गोधंळे गल्ली, दत्तनगर रामनगर पिपरी), केशव उर्फ ओम किशोर आलंकार (वय १८ वर्षे रा. सचिन टेलर्स जवळ दत्तनगर पिंपरी) व त्यांचा एक विधीसंघर्षीत साथीदार अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चिखली, दिघी व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोटर सायकलवरुन फिरुन नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून एकूण ६ अॅन्ड्राईड मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण १,३८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ४३५ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाण, चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ४३७ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे ३) दीघी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २९८ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ मधील गुन्हे उघडकीस आले असुन आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्ता आहे. आरोपीत यांचेकडे सखोल तपास सुरु आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.