- महायुतीच्या उमेदवारांसाठी सभेचे नियोजन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपात मावळ व रायगड मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. मावळ लोकसभा निवडणुकीचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवार हे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असून, रायगडचे उमेदवार अनंत गीते आहेत. शिवसेनेने दोघांना उमेदवारी दिली आहे.
मावळमध्ये यावेळी परिस्थिती बदलली आहे. तसेच विरोधी उमेदवारही तगडा आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ लोकसभेतून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे. परंतु, यावेळेस मात्र वाट खडतर आहे. तसेच बारणे यांना यावेळेस मात्र, तगडे आव्हान असणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अनंत गीते यांनी केवळ दोन हजार शंभर मतांच्या फरकाने सुनील तटकरे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात विरोधी लाट निर्माण करून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे महायुतीकडून नियोजन सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते.
त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सेना-भाजपचे स्टार प्रचारक यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरु असल्याचेही समजते. या दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या सोयीच्या दृष्टीने जागा शोधण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे.










