न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- मावळ लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदार संघातून सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे.
खासदार बारणे यांनी भाजपचे शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी प्रचारात सक्रीय होण्यासाठी भेट घेतली होती. परंतु, आमदार जगताप प्रचारात सहभागी झाले नाहीत. अखेर शनिवारी मुंबईतून सूत्रे हालली आणि संजय राऊत शहरात पोहोचले.
खासदार संजय राऊत, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार निलम गोऱ्हे व स्थानिक मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र ही चर्चा अयशस्वी झाली. तसेच संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही स्थानिक भाजप नेत्यांनी महत्त्व न दिल्यामुळे युतीतील तणाव वाढत चालला आहे.
विशेषतः भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप कोणत्याही परिस्थितीत झाले-गेले विसरण्यास तयार नाहीत. दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप मावळात “मनोमिलन’ झालेले नाही.










