न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे विविध विभागांच्या जबाबदारीचे कामकाज असून, त्याचे फेरवाटप प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आयुक्तांच्या सर्व अधिकारांचा वापर करून आपापल्या विभागांची कर्तव्ये व कार्ये करण्याचा अधिकार अतिरिक्त आयुक्तांना आहे. मात्र, त्यांच्या अखत्यारीतील धोरणात्मक निर्णय घेण्याचे व महापालिका सर्वसाधारण व स्थायी समितीला सादर करायच्या प्रस्तावांना आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. त्यातील दोन पदे अर्थात पद एक व दोनसाठी शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तर, तृतीय क्रमांकाच्या पदासाठी महापालिका सेवेतील अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती केली जाते. सद्यःस्थितीत एक क्रमांकाच्या पदावर प्रदीप जांभळे, द्वितीय क्रमांकाच्या पदावर विजयकुमार खोराटे आणि तृतीय क्रमांकाच्या पदावर उल्हास जगताप काम पाहात आहेत. सहा जुलै रोजी द्वितीय क्रमांकाचे अधिकारी जितेंद्र वाघ यांची त्यांच्या मूळ आस्थापना महसूल विभागात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त खोराटे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह जांभळे व जगताप यांच्याकडील कामकाजाचे वाटपही सिंह यांनी केले.
अशी आहे जबाबदारी..
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह – लेखा, विशेष प्रकल्प (अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएम)
अतिरिक्त आयुक्त (एक) प्रदीप जांभळे – उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशामक, शिक्षण, स्थापत्य (उद्यान), माध्यमिक शिक्षण मुख्य कार्यालय, अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व त्याअंतर्गत सर्व विभाग, आपत्ती व्यवस्थापन.
अतिरिक्त आयुक्त (दोन) विजयकुमार खोराटे – सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय), क्रीडा (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृह), स्थापत्य प्रकल्प, वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना, निवडणूक व जनगणना विभाग, भूमि व जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा, बीआरटी, जलनिःसारण.
अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप – सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, मोरवाडी व कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, आर्थिक दुर्बल घटकांसह अन्य गृहप्रकल्प, झोनिपू स्थापत्य, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण विभाग.












