- पवना धरण ५१ टक्क्यांवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- मागील पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ५१ टक्के म्हणजे निम्मे भरले आहे.
पुढील सहा महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. मागील पाच दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. १ जूनपासून धरण परिसरात एक हजार १० मिमी पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ३३.४४ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ५१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.












