न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- समाजात अशा अनेक व्यक्ती दिसतात ज्या दैनंदिन वस्तूंसाठी वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील आनंदाचे काही क्षण यावेत याकरीता आज सोमवार (दि. १) रोजी सेल्सफोर्स कंपनीच्या २८ स्वयंसेवकांनी प्रयत्न सामाजिक संघटनेसोबत संयुक्तपणे सीएसआर अंतर्गत वेगवेगळे उपक्रम मावळातील काही गावात राबविले.
प्रयत्न सामाजिक संघटना व सेल्सफोर्स कंपनीच्या स्वयंसेवकांनी मावळातील मळवली येथील शिक्षणग्राम वसतिगृहातील अनाथ व वंचित १७५ मुलांना तसेच पाचाणे येथील श्रीमती शांताबाई येवले यांच्या आमाळमाया या वसतिगृहातील २५ मुलींना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी शालेय साहित्य, टोपी व खाऊचे वाटप वाटप करण्यात आले. हा उपक्रम सेल्सफोर्स कंपनीच्या सीएसआर अंतर्गत राबविण्यात आला. मुलांना वस्तुवाटप करताना प्रत्यत्न चे सर्व सभासद व हैदराबादच्या सेल्सफोर्स चे २८ स्वयंसेवक उपस्थित होते.
या सोबतच मुला-मुलींसाठी बाल व लैंगिक शोषण ह्या विषयावर एक कार्यशाळा देखील घेण्यात आली. स्वतःचा बचाव कश्या प्रकारे करावा? या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीमती शांताबाई येवले यांच्या आमाळमाया या संस्थेला कुठलेही सरकारी अनुदान नाही. त्यामुळे हा उपक्रम येथील मुलींसाठी मोलाचा ठरला आहे. येथील २५ मुलींना संपूर्ण शालेय व संस्थेला पुढील ६ महिन्यासाठी पुरतील एवढ्या दैनंदिन वस्तू, किराणा व आदी गोष्टीही देण्यात आल्या.











