न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- अकरावी प्रवेशाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज सोमवारी (दि. २४) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे.
या फेरीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांत १ लाख १५ हजार ९५० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी एकूण ९९ हजार ७३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ९७ हजार ८१५ जागांपैकी ३७ हजार ५५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. कोट्याअंतर्गत १८ हजार १३५ जागांपैकी ६ हजार ५६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तीन नियमित फेऱ्यांमध्ये एकूण ४४ हजार ११४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. केंद्रीय प्रवेशांसाठी उपलब्ध जागांपैकी ६० हजार २६५, तर कोट्याअंतर्गत ११ हजार ५७१ अशा एकुण ७१ हजार ८३६ जागा रिक्त आहेत.












