- ‘पाच वर्षात प्रत्येक वेळी संधी असताना डावलले गेले’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- भाजपाच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड झाली. त्यास भाजपातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. पक्षात अन्याय झाल्याने चिंचवड मतदार संघातील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पक्षश्रेष्ठीकडे दाद मागणार आहेत. स्थायी समितीचे माजी सदस्य शत्रुघ्न काटे यांच्यासह चिंचवड मतदार संघातील नेते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील ७० अध्यक्षांच्या नियुक्त्या बुधवारी जाहीर केल्या. त्यात पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नेमणूक केली.या निवडीवरून भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे.
याबाबत बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, ”एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्त्वांना तिलांजली दिली जात आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे. पाच वर्षात प्रत्येक वेळी संधी असताना डावलले गेले तरीही पक्षाबरोबर एकनिष्ठ आहोत. येत्या आठवड्याभरात अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांचा गट आणि पदाधिकारी भूमिका स्पष्ट करणार आहेत”, असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.