- कामानिमित्त पुण्यातील आरटीओत जाण्याचा त्रास वाचणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आरटीओतील कामानिमित्त नागरिकांना पुण्यात मारावा लागणारा हेलपाटा आता लवकरच वाचणार आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढविण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होता. गृह विभागाने परिवहन आयुक्तांच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून त्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर होणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कुलचा परवाना, नॅशनल परमीट आदींसाठी पुणे आरटीओमध्ये नागरिकांचा होणारा हेलपाटा वाचणार आहे.
दर्जा वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी वाढल्यामुळे सध्याच्या मनुष्यबळावर येणारा ताण कमी होणार आहे. नागरिकांची अनुज्ञप्ती, वाहन फिटिंग प्रमाणपत्र, पासिंग आणि इतर कामे वेळेत होण्यासाठी मदत होणार आहे.
अशी होणार पद निर्मिती…
प्रादेशिक परिवहन अधिकारी १, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी २, सहायक परिवहन अधिकारी ४, मोटर वाहन निरीक्षक ३०, सहायक मोटर वाहन निरीक्षक ४०, लिपिक १२.
नागरिकांचा आरटीओमधील कामासाठी पुण्यामध्ये होणारा हेलपाटा आता वाचणार आहे. तसेच मनुष्यबळ वाढणार असल्याने कामाचा वेग देखील वाढणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. – अतुल आदे, उपप्रादेशिक परिहवन अधिकारी, पिंपरी-चिंचवड…














