- आरटीईच्या चौथ्या फेरीची मुदत उद्या संपुष्टात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जूलै २०२३) :- मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडली. आरटीईच्या तीन फेऱ्या झाल्या असून, त्यामध्ये ३,०१८ जणांचे प्रवेश निश्चित झाले तर २२५ जागा रिक्त असल्याने चौथी फेरी राबवण्यात आली. मात्र, चौथी फेरी संपण्यासाठी दोन दिवस बाकी राहिलेले असतानाही फक्त ९ प्रवेश झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. आरटीई प्रवेशामध्ये तिसऱ्या फेरीअखेर आकुर्डी अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये आरटीईसाठी एकूण २,१८५ जागा आहेत. त्यापैकी २,०२५ जागांवर प्रवेश झाले आहेत तर १३३ जागा शिल्लक आहेत.
पिंपरी अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये आरटीईच्या एकूण १,०८६ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ९९३ जागांवर प्रवेश झाला आहे. ९२ जागा शिल्लक राहिल्या. तिसऱ्या फेरीअखेर एकूण २२५ जागा रिक्त होत्या. त्यामुळे चौथी फेरी राबवण्यात आली आहे. आरटीईच्या चौथ्या फेरीची मुदत शनिवारी (दि. २९) संपणार आहे.


















