न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरूद मिरवणारी पिंपरी चिंचवड महापालिका आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या महापालिकेतील विविध विभागातील १३३९ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपये खर्चाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या बाबत राष्टवादी काँग्रेस चे विरोधीपक्ष नेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना पत्र दिले.
या पत्रात त्यांनी असे म्हंटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील १३३९ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपये खर्चाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रातून व न्युज पोर्टलमधून प्रसिध्द झाले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा प्रकार केला गेला असण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण गंभीर असल्याने ज्या ज्या विभागातील कागदपत्रे गहाळ झाले आहेत. त्या त्या विभागाच्या प्रमुखांना जबाबदार धरुन त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणे संयुक्तीक आहे. तरी सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची खातेनिहाय चौकशी तात्काळ सुरु करण्यात यावी. कृपया यात दिरंगाई केली जाऊ नये. अन्यथा आपण गैरप्रकारात खतपाणी घालत असल्याचे आम्ही समजू तरी, त्वरित संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. नाही तर मी आपल्या विरोधात कोर्टात दाद मागेण, असे या पत्रात साने यांनी म्हंटले आहे.










