- पालिकेच्या वीज बिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मोशीतील कचरा डेपोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प महापालिकेने डीबीओटी तत्त्वावर उभारला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला असून कचऱ्यापासून वीज तयार झाली आहे.
महापालिकेने वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ट्रायल रन घेतली असून, त्यामध्ये १.०७ मेगाव्हॅट वीज तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुण्यात कार्यक्रमांसाठी येत आहेत. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू आहे.
मोशी कचरा डेपोत उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून कच-यापासून दैनंदिन १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. ही वीज प्रति युनिट ५ रुपये दराने पालिकेस पुढील २० वर्षे उपलब्ध होणार आहे.
महापालिका क्षेत्रातून सद्यःस्थितीत मोशी कचरा डेपोमध्ये प्रतिदिन सुमारे ७०० टन सुका, ४०० टन ओला, असा एकूण ११०० मेट्रिक टन कचरा येतो. या कचरा डेपोसाठी सुमारे ८१ एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या ताब्यात आहे. त्याठिकाणी मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लांट, गांडूळ खत प्रकल्प, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती असे प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामुळे पालिकेच्या वीज बिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, अद्याप तयार होणारी वीज वहनासाठी महावितरणच्या यंत्रणेसोबत सुरु असेलली प्रक्रिया अद्याप झालेली नाही. काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू आहे.
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. कच-यापासून वीज तयार करण्याची ट्रायल घेण्यात आली. यशस्वीरीत्या १.०७ मेगावॅट इतकी वीज तयार केली. महावितरणाशी निगडित काही कामे सुरु असून प्रकल्पाच्या उद्घाटनाचे नियोजनदेखील सुरु आहे.
-संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता












