- रोखीने वीज बिल भरणा करण्यावर मर्यादा..
- ऑनलाइनसह आरटीजीएस, एनईएफटीचा दिला पर्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- महावितरणने कॅश वीज बिल भरण्यास मर्यादा आणली आहे. लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक सोडून सर्वांना दरमहा केवळ पाच हजार रुपयांपर्यंतचे वीज बिल कॅशने भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीज बिल कॅश भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.
विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवार (दि. १ ऑगस्ट) पासून महावितरणच्या वीज बिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीनेच वीज देयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइनसह आरटीजीएस, एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करता येऊ शकतो. या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पद्धतीत ग्राहक वीज देयकाचा भरणा क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंग व यूपीआयनेही करू शकतो. भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरता येणार आहे.