न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल) :- भारतीय जनता पक्षाचे व्यासपीठ हे सर्व जाती धर्मांना सामावून घेणारे आहे. भाजपच्या सर्व कार्यक्रमात प्रथम भारतमातेचे पूजन केले जाते. भारतमाता ही कोणत्याही जाती धर्माची नाही, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
शिरूर लोकसभेचे भाजप, सेना, रासप, महासंग्राम महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील संत ज्ञानेश्वर गार्डन मंगल कार्यालय येथे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. आढळराव, आमदार महेशदादा लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे, पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे, शैला मोळक, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, रासपचे शहराध्यक्ष भरत महानवर, शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, डॉ. प्रतिभाताई लोखंडे, विजय फुगे तसेच भाजप सेनेचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी लांडगे म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहे. पुढच्या पिढीचे भविष्य, शिक्षण, रोजगार, देशाची सुरक्षा, माता भगिनींची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी या निवडणुकीत भोसरी विधानसभेतून एक लाखांहून जास्त मतदान आपण आढळराव पाटील यांना मिळवून देऊ.
खा. आढळराव म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात मी दहा वर्षे खासदार होतो. जगात भारताचे नाव पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमाणे आत्तापर्यंत कोणी केले नाही. राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत. देशात लहानापासून थोरांपर्यंत सर्वांची एकच भावना आहे की, मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता उत्तम आहे. देशभर मेट्रोचे जाळे उभारण्याचा निर्णय त्यांनी सरकार स्थापनेनंतर ताबडतोब घेतला असेही आढळराव यांनी सांगितले.










