- नदीपात्र अरुंद आणि दुषित करणाऱ्यांवर कारवाई कधी?..
- माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पालिका प्रशासनाचे काढले वाभाडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- पवना नदी पुन्हा फेसाळली असून महापालिकेचा पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करीत आहे. पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये, संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पवनामाई दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई पालिका कधी करणार. दुषित पाणी पिल्याने नागरिक दगवायची किंवा मोठी घटना घडण्याची वाट बघत आहे का?, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर आज (दि. २१) रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आहे. तसेच, अनेक नाले थेट नदीत मिसळत आहेत. या कारणांमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी वरदायनी असणाऱ्या पवनामाई नदीची दुरवस्था झाली आहे.
मागील जुलै महिन्यात १६ जुलै २०२३ रोजी पवना नदीपात्र असेच फेसाळले होते. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते. नदीनाल्यात वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची वेस्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत दोन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाय योजनांची गरज आहे.
नदीपात्रामध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून उभारलेले अनधिकृत भराव. त्यामुळे अरुंद होणारे नदीपात्र, यामुळे नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे नियोजन करावयास हवे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प गेली नऊ वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे. केवळ पवना व इंद्रायणी नदी सुधारसाठी कोट्यावधी रुपये निधीची तरतूद कागदावर न करता तातडीने अंमलबजावणी करावी.
मा. विठ्ठल उर्फ नाना काटे (माजी विरोधी पक्षनेते)…















