न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- पोलिस भरती प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्यांचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला होता. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले. राज्यातील विविध घटकांमध्ये पोलिस शिपाई व चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत हे संबंधित घोटाळेबाज सहभागी होऊन पुन्हा घोटाळा करू शकतात, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पोलिस महासंचालक व संबंधित घटक प्रमुखांना कळविले आहे. त्यात ६८ जणांची नावे दिली आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे.
पिंपरी-चिंचवड घटकाच्या आस्थापनेच्या सन २०१९ च्या जाहिरातीनुसार सन २०२१ मध्ये भरती प्रक्रिया पार पडली. दरम्यान, भरतीमध्ये काही उमेदवार बोगस असून काहीजण गैरप्रकार करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले. गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींची संख्या नव्वदवर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील भरती उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. सध्या राज्यातील विविध घटकांमध्ये सुरू असलेली भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रेकॉर्डवर असलेले आरोपी व त्यांचे साथीदार तेथे देखील अशाप्रकारे घोटाळे करण्याची शंका पिंपरी- चिंचवड पोलिसांना आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिसांनी महासंचालक कार्यालयासह राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाचे सर्व समादेशक, लोहमार्ग विभागाचे सर्व अधीक्षक यांना आरोपींची माहिती कळविली आहे.
पिपरी-चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघडकीस आणत या प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घोटाळ्यातील आरोपी पुन्हा इतरत्र सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ नयेत, यासाठी महासंचालक कार्यालयासह इतर घटक प्रमुखांना माहिती दिली आहे.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी…















