- सुदुंबरेतील संतांच्या भूमीचाही कायापालट करा..
- केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- श्री क्षेत्र देहूगावपासून जवळच असलेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर या चिंतन ठिकाणी दावडी निमगावच्या धर्तीवर रोप वे किंवा वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी ज्याप्रमाणे व्यवस्था केली आहे, त्या पद्धतीची लिफ्ट व्यवस्था करावी, अशी मागणी पुणे, नाशिक महामार्गाचे समन्वयक अभियंते दिलीप मेदगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
त्याचप्रमाणे चाकण, तळेगाव, शिक्रापूर या ५४ किलोमीटर एलेक्टेड कॉरिडॉरला गती द्यावी व हेही काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र भंडारा डोंगर हा सुवर्ण पर्वत म्हणून देखील ओळखला जात आहे. या ठिकाणी येथील श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानच्या वतीने भव्य, सुसज्ज असे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. हे ठिकाण जगद्गुरू संत तुकाराम यांच्या जन्मभूमीपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. श्री क्षेत्र देहूगाव ते भंडारा डोंगर या रस्त्यावर श्री संत तुकाराम महाराजांच्या कन्या संत भागीरथी माता यांचे गाव येलवाडी व दुसऱ्या बाजूला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र सुदुंबरे हे ठिकाणदेखील आहे.या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिणारे श्री संत संताजी महाराज जगनाडे व श्री संत गवरशेठ वाणी यांची समाधीस्थळ आहे. त्यामुळे हे ठिकाण भविष्यात चांगले विकसित होणार आहे. हे ठिकाण आपल्या तळेगाव-चाकण- शिक्रापूर या महामार्गाजवळच आहे.
या नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरमध्ये विशेष बाब म्हणून श्री संत तुकाराम महाराज, श्री संत संताजी जगनाडे महाराज, श्री संत गवरशेठ वाणी महाराज आणि श्री क्षेत्र देहू येथील विठ्ठलाचे दर्शन व्हावे, यासाठी रोप वे किंवा लिफ्टसाठी मंजूरी देऊन परिसराचा कायापालट करावा, अशी मागणी अभियंते दिलीप मेदगे यांनी केली आहे.