- मीठाच्या उद्योगात टाटा आणि चर्मोद्योगात बाटा आल्यामुळे वंचितांवर अन्याय – राजाराम पाटील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०१९) :- नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणा-या मावळ लोकसभा मतदार संघातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त बाधित शेतक-यांचे प्रश्न गेल्या साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. केंद्र सरकारने बंदरांसाठी, औद्योगिकीकरणासाठी पारंपारिक शेती करणा-या शेतक-यांच्या, कोळी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतू, त्यांना न्याय मोबदला दिला नाही. या प्रश्नांवर मी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत सांगितले.
पिंपरी येथे गुरुवारी (दि. ४ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भारीपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, माजी नगरसेवक रामचंद्र माने, अंकुश कानडी तसेच सुरेश गायकवाड, रजनीकांत क्षीरसागर, राहुल इनकर, राजेश बारसागडे, के.डी. वाघमारे, सनी गायकवाड, भिमाताई तुळवे, रुहीनाज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी राजाराम पाटील म्हणाले की, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी व पिंपरी चिंचवडला जागतिक दर्जाची उद्योगनगरी बनविण्यात स्थानिक शेतक-यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जमिनी सरकारने वेळप्रसंगी गोळीबार करुन ताब्यात घेतल्या. वाढत्या औद्योगिकीकरणात पारंपारिक व्यवसाय करणारे शेतकरी, कोळी बांधव, आगरी बांधव बेरोजगार झाले. मागील साठ वर्षात त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला पुर्ण मिळाला नाही. पर्यावरणाच्या नावाखाली समुद्रातील रेती काढण्यावर बंदी आणली. त्यामुळे आगारी – कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाडींमध्ये रेती साचल्यामुळे मासेमारीवर आणि बंदरांवर बोटी आणण्यावर परिणाम होत आहे. उरण – पनवेलला रेती उपसा बंद करुन गुजराथ मधून रेती का आणली जाते. तसेच विमानतळ व रस्ते बांधण्यासाठी डोंगर, टेकड्या फोडून पर्यावरणाची हानी होत नाही का? असाही प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
राजाराम पाटील व राहुल ओव्हाळ यांनी पिंपरीतील एच.ए. कंपनी प्रवेशव्दारावर कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
वंचित बहुजन आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील आणि शिरुर लोकसभेचे उमदेवार राहुल ओव्हाळ सोमवारी (दि. ८ एप्रिल) सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती देवेंद्र तायडे यांनी दिली.










