न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- महारेराच्या वतीने रियल इस्टेट एजंटांना व्यवसाय करण्यासाठी सक्षमता प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटांशी प्रवर्तकांनी किंवा विकासकांनी व्यवहार करू नयेत, असे ‘महारेरा’चे स्पष्ट निर्देश आहेत. नोंदणीकृत व सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या एजंटांमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे आवाहन ‘महारेरा’ने ग्राहकांना केले आहे.
‘एसआयआयएलसी’ ही महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे. नव्याने एजंट होणाऱ्यांना किंवा नोंदणीचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र बाळगणे आता अनिवार्य आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या अधिकच्या कार्यशाळा प्रशिक्षणा दरम्यान होणार आहेत. प्रशिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.