- अन्यथा युवकांचे आंदोलन उभारू; रयत विद्यार्थी परिषदेचा पालिकेला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक वगळता इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये. अन्यथा आम्ही कायदेशीर लढाई बरोबरच बेरोजगारांचे मोठे आंदोलन उभारू. येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी ई मेल निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या माजी सैनिक यांच्या नावाखाली काही संस्था शहरातील देशाचे भविष्य असलेल्या लाखो बेरोजगार युवक, बेरोजगार सहकारी संस्था यांच्यावर उपासमारीची वेळ आणत आहेत. आम्हांला देखील माजी सैनिकांबद्दल नितांत आदर व प्रेम आहे. पण त्याअगोदर भावी पिढीबाबत जागृक राहणे ही देखील आमची प्रथम जबाबदारी आहे. आज तरुण देखील आपल्या देशाचा कणा असून या तरुणांवरच देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. पण सध्या काही माजी सैनिकांच्या नावाखाली सैनिकांच्या काही संस्था व काही महामंडळे महापालिकेत व्यवसाय मांडत असून शहरातील लाखो तरुणांचे रोजगार पळवत आहेत. एकीकडे सरकारची पेन्शन पण घ्यायची याबरोबरच विविध लाभ घेऊन पुन्हा बेरोजगार तरुणांचा रोजगार पळवायचा; हा प्रकार देशाच्या विकासाच्या दृष्टीने घातक असून स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
आज शहरात अनेक झोपडपट्ट्यापासून मध्यमवर्गिय घटकामध्ये अनेक होतकरु व पात्र तरुण, व्यक्ति रोजगारापासून वंचित आहेत. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. याला महापालिकेचे असे चुकीचे धोरण कारणीभुत आहे. आज महापालिका माजी सैनिकांना घराच्या करामध्ये सर्वात जास्त सुट देत आहे. तसेच राज्य व केंद्र सरकार देखील त्यासाठी विविध योजना राबवून त्यांना लाभ देत आहे. तसेच अनेक सुरक्षा रक्षक भरतीमध्ये त्यांना संधी देत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे व त्यांना सुरक्षारक्षक म्हणून नौकरीची संधी देणे रास्त आहे. पण, सुरक्षा रक्षक सोडून इतरही अनेक ठिकाणी सध्या महापालिका त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काम देत आहे. माजी सैनिकांना पेन्शन बरोबरच इतरही अनेक लाभ मिळत असताना त्यांना सुरक्षा रक्षक सोडून इतरही कामे देण्यामुळे शहरातील रहिवाशी बेरोजगारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे अनेक तरुण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. शासनाकडून बेरोजगार युवकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात, पण महापालिकेकडून या बेरोजगारांसाठी एकही योजना राबवली जात नाही. उलट अशा प्रकारामुळे कुठेतरी रोजगाराची आलेली संधी देखील त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते. महापालिकेच्या या कृतीमुळे तरूणामध्ये तीव्र संताप व्यक्त असून याचा आंदोलनामार्फत केव्हाही स्फोट होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच माजी सैनिक संस्थाना काम देतानासुध्दा अनेक नियमांचे उल्लघंन केले जाते. शासनाच्या आदेशानुसार त्यांना फक्त सुरक्षारक्षक या क्षेत्रामध्येच काम करण्यासाठी निवीदा न काढता थेट काम दिले जाते. पण महापालिकेतील काही अधिकारी वर्गाकडून तो नियम सर्रासपणे मोडून सुरक्षा रक्षकांना सर्वच ठिकाणी कामाला लावून त्यांना इतरही काम दिले जाते. हा प्रकार देखील महापालिकेच्या भ्रष्ट काराभाराचा एक नमुनाच म्हणता येईल. यामुळे माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक विषय सोडून इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये. अन्यथा आम्ही कायदेशीर लढाई बरोबरच बेरोजगारांचे मोठे आंदोलन उभारू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.












