- १८ सदस्यीय संघाचे सदस्य शाळांपर्यंत जाऊन करणार पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :-महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी, सर्व शिक्षकांना नियमित मदत मिळावी, शैक्षणिक गुणवत्तेत भर पडत राहावी तसेच शिक्षण विभागामार्फत राबविले जाणारे उपक्रम अधिक सक्षमपणे शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागाने १८ सदस्यीय संघाची (कोअर टीम) स्थापना केली आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणारे विविध कार्यक्रम, योजना, उपक्रम तसेच या कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि आढावा घेण्यासाठी कोअर टीमची भूमिका महत्वाची असणार आहे, असेही ते म्हणाले.
कोअर टीमबाबत माहिती देताना शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाच्या मदतीसाठी कोअर टीमची प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र स्थापना करण्यात आली आहे. ही कोअर टीम शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणा-या शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये तसेच अध्यापनासंदर्भात सहाय्यकारक ठरेल असे काम करणार आहे. महापालिकेच्या शाळांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये शिक्षणाची प्रक्रिया कशी चालते, विविध प्रकारे विद्यार्थ्यांना अध्यापन कसे केले जाते या दृष्टीकोनातून क्षमता बांधणीसाठी या टीममधील सदस्यांसोबत अभ्यास दौऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन धोरणांची आखणी शिक्षण विभागाकडून केली जात आहे. तसेच नामांकित सार्वजनिक शाळांना भेट देण्याबाबत शिक्षण विभागाकडून भविष्यातील शैक्षणिक दूरदृष्टीकोन विचारात घेऊन विविध धोरण आणि उपक्रम आखले जाणार आहेत.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विविध अग्रगण्य शिक्षण संस्थांना दिलेल्या भेटीमुळे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणे आखण्यास मदत होत आहे. ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा प्रेरणादायी अनुभव बनवण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते आणि यासाठी भविष्यात आम्ही कोअर टीमच्या साहाय्याने दिल्ली पब्लिक स्कूलला भेट देण्याची योजना आखत आहोत.
कोअर टीमची कार्यपद्धती…
• शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध कार्यक्रम पोहचवण्यासाठी शिक्षण विभाग व शाळा यामध्ये दुवा म्हणून काम करणे.
• शिक्षण विभागातर्फे राबवले जाणारे उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले आहेत का, हे जाणून घेण्यासाठी कार्यक्रमांचा आढावा घेणे आणि मूल्यमापन करणे.
• कोअर टीमची जबाबदारी सोपविलेल्या संबंधित शिक्षकाने झालेल्या कामाचा दरमहा आढावा देणे कार्यक्रम राबविल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार करून तो संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवणे
• कोअर टीममधील सदस्यांच्या क्षमता बांधणीसाठी महिन्यातून एक कार्यशाळा आयोजित करणे












