न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. ७ एप्रिल) :- भाजप उद्या लोकसभा निवडणुकासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपनं २०१४ मध्येही राज्यघटनेच्या चौकटीत बसून राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच काँग्रेसच्या न्याय योजनेला भाजपच्या जाहीरनाम्यातून कशाप्रकारे पाहिलं गेलंय हे उद्याच समजणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप उद्या २०१९ च्या लोकसभेसाठी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजप जाहीरनाम्यात राम मंदिराबरोबरच, कलम ३७० आणि समान नागरी संहिता रद्द करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजना आणि देशद्रोहाचं कलम रद्द करण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप देशवासियांना कोणता नवा वायदा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.










