- आम्ही दोघेही दोन-दोन पाऊले मागे येत, एकमेकांवर केलेले आरोप मागे घेत आहोत – खासदार बारणे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशस्वी शिष्टाई करीत, आमच्यात मनोमिलन घडवून आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभेतून २ लाखांचे मताधिक्य मिळवून देणार, असा दावा आमदार जगताप यांनी केला आहे.
शिवसेना-भाजप-आरपीआय-महायुतीचे अधिकुत उमेदवार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आज सोमवार (दि. ८ एप्रिल) रोजी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन बाबर, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, युवासेना समन्वयक जितेंद्र ननावरे, नगरसेवक नामदेव ढाके, अमोल थोरात आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, बारणे व मी आम्ही दोघांनीही आत्मपरीक्षण केले. आमच्यात गैरसमजुतीतून आरोप-प्रत्यारोप झाले. ते दूर करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्नही केले आहेत. आमच्यात राजकीय मतभेद होते, परंतु, मनभेद कधीही नव्हते. व्यक्तीपेक्षा देश व पक्ष मोठा आहे. देशाला अजूनही पंतप्रधान मोदींची गरज आहे. त्यांना साथ देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाणित मानून मी व भापजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार बारणे यांना चिंचवड विधानसभेतून दोन लाखांचे मताधिक्य मिळवून देणार आहोत, असे जगताप यांनी यावेळी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले की, मी मतदारसंघात गेली पाच वर्षे विकासकामे केलेली आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मी व आमदार जगताप आम्ही दोघे समोरासमोर होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार मागे काही दिवसांपूर्वी मी हेवे-दावें दूर सारत आमदार जगताप यांची भेट घेऊन त्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. संजय राऊत, नीलम गोऱ्हे, गिरीश महाजन यांनीही आमदार जगताप यांच्याशी चर्चा केली होती. त्या चर्चेला यश आले असून, मी व आमदार जगताप आम्ही दोघेही दोन-दोन पाऊले मागे येत, एकमेकांवर केलेले आरोप मागे घेत आहोत. एकमेकांवर केलेले आरोप हे राजकीय दृष्टिकोनातून होते. राजकीय वितुष्ट संपवत आम्ही दोघेही एकत्र आलो आहोत.










