न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, शासकीय कार्यालयांची आजही शहरात वानवा आहे. प्रत्येक कामासाठी नागरिकांना पुण्यात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे पासपोर्ट कार्यालयाचा मोठा प्रश्न मार्गी लागला.
पिंपरी येथे २ एप्रिल २०१७ रोजी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. पूर्वी मुंढवा-पुणे येथे पासपोर्ट कार्यालयात नागरिकांना जावे लागत होते. नागरिकांचा संपूर्ण दिवस त्यासाठी खर्ची पडत होता. त्याच बरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मुंढवा येथे जाणे गैरसोयीचे होते. त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पिंपरी येथे पासपोर्ट कार्यालय झाल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ, चाकण, हिंजवडी या भागातील नागरिकांनाही हे पासपोर्ट कार्यालय सोयीचे झाले आहे. नागरिकांना पुण्याला मारावे लागणारे हेलपाटे वाचले आहेत. पासपोर्टचे कार्यालय पिंपरी-चिंचवड शहरात झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. पनवेल येथील कार्यालयाला परराष्ट्र मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हे कार्यालय देखील सुरू होणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.










