अन्यायाविरोधात झोपडपट्टीवासियांचा एल्गार मोर्चा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या झोपडपट्टी विभागातील महिला कार्यकर्त्यांची बैठक सोमवार (दि. ८) रोजी भोसरी एमआयडीसीतील भोर रबर इंडस्ट्रीज येथे संपन्न झाली. यावेळी वनिता भांडेकर, गवळण ओवाळ, सारिका वाघमारे, शीतल शिंदे, रेखा ओव्हाळ आणि सतीश भांडेकर तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांच्या समस्या पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांच्या पुढे मांडल्या.
भोर म्हणाले की, गेली तीस वर्षे झोपडपट्टी भागातील लोकांचा सत्ताधाऱ्यांनी फक्त वापर करून घेतला. आजपर्यंत महानगरपालिकेने परिसरातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी, महिला, तरुणास कुठल्याही शासकीय सवलती व मुलांना नोकऱ्या तर सोडाच, पण झोपडपट्टीचे नाव ऐकल्यास गेटवरसुद्धा उभे करत नाहीत. महिलांना बिगारी आणि घर कामाशिवाय कुठे नोकरीला ठेवत नाहीत. सरकारी योजनेसाठी त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. बऱ्याच जणांकडे लाईट बिलही नसते. तसेच झोपडपट्टीतील जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी एकीकडे शासनाचे प्रयत्नही चालू असतात. श्रीमंतांसाठी एक हजार स्क्वेअर फुटांचे फ्लॅट बांधणारे, गरिबांना मात्र, शहराबाहेर काढत आहेत, अशी मानसिकता दिसत आहे. ही मानसिकता उखडून फेकली पाहिजे. झोपडपट्टी धारकांना त्या जागी घरे बांधून दिली पाहिजेत. अन्यथा गरीब फक्त नोकरी पुरता येत राहील.
परिसरामध्ये अनेक असुविधा निर्माण केल्या जातात. जसे की परिसरात कधी पाणी असते, कधी नसते. त्यामुळे परिसराची स्वच्छता व्यवस्थीतरीत्या होऊ शकत नाही. अंतर्गत रस्त्यांची देखभाल होत नाही. परिसरात वीज उपलब्ध नसते. या ना त्या कारणावरून परिसरातील नागरिकांना वेठीस धरले जाते. स्मार्ट सिटीमध्ये फक्त श्रीमंतांकडे लक्ष दिले जाते व त्यांच्या सोयी बघितल्या जातात. गरीबांसाठी कुठलीही सुविधा नाही. परिसरात वाचनालय महानगरपालिकेने उभी केली आहेत. परंतु, त्यामध्ये कधी पेपर येत नाही. मात्र, पेपरची बिल भरले जाते.
पिंपरी चिंचवड शहराचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झोपडपट्टी भागातील लोकांचा सहभाग मोठा आहे. त्यांची मेहनत आहे. त्यांच्या मेहनतीवर परिसरात अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहिले. परंतु, आज या लोकांनाच गैरसुविधांनी वेढलेले आहे. आज त्यांच्या मुलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेघर होण्याची वेळ येत आहे. तरी महानगरपालिकेने वेळेत लक्ष न दिल्यास पिंपरी शहर विकास आघाडीतर्फे मोठे आंदोलन उभारले जाईल. तसेच झोपडपट्टी परिसरातील तरुण तरुणींना उद्योग व्यवसाय या दृष्टीने पूर्णपणे आघाडी मदत करेल व सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध शिबिरे घेतली जातील, असे विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांनी यावेळी सांगितले.










