न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- खासदार बारणे व आमदार जगताप यांच्या एकत्र येण्याने सर्व प्रश्न संपणार आहेत का? एकमेकांवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप तसेच महापालिकेच्या प्रश्नांवर केलेली आगपाखड विसरून हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा घणाघात शहर राष्ट्रवादीने भाजप व आमदार लक्ष्मण जगताप तसेच शिवसेनेचे खासदार बारणे यांच्यावर केला आहे.
शहर राष्ट्रवादीने बारणे व जगताप यांच्या मनोमिलनाच्या विरोधात मोरवाडीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवाणी आदी उपस्थित होते.
संजोग वाघेरे म्हणाले की, “शिवसेना खासदारांनी भाजप आणि आमदारांवर विविध आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या आवास योजनेत देखील गैरव्यहार झाल्याचा आरोप केला होता. त्यासह भाजपच्या राजवटीत महापालिकेत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. आता झालेले मनोमिलन दोषारोप, भ्रष्टाचारासह झाले आहे का? असा सवाल करत लाज कशी वाटत नाही. तसेच आमदारांनी देखील खासदारांवर आरोप केले होते. खासदारांनी मावळात कुठे विकास केले हे दुर्बिणीने शोधावे लागेल. फोटोवाला खासदार, असे आरोप केले होते? त्याचे काय झाले.
प्रशांत शितोळे म्हणाले, “खासदारांनी केलेले आरोप सार्वजनिक विकास कामाबाबत होते. खासगी, घरगुती आरोप नव्हते. आवास योजना, कच-याच्या निविदेबाबत तर केंद्र सरकारला पत्र दिले होते. त्या आरोपाचे काय झाले. भ्रष्टाचाराचे मनोमिलन झाले का? ” असा सवाल करत हे मनोमिलन म्हणजे ‘ व्यावसायिक करार असल्याचा आरोपही त्यांनी केला.










