- जोरदार शक्तीप्रदर्शन करीत महाआघाडीच्या सर्व नेतेमंडळींनी दाखविली एकजूट
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- लोकसभेच्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. आघाडीच्या वतीने रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पार्थ यांचे वडील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाऊ जय पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी पिंपरीतील एच.ए कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर, निगडीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे अंकुश काकडे आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार, माजी मंत्री मदन बाफना देखील उपस्थित होते.
आहेर गार्डन वाल्हेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार अण्णा बनसोडे, बापूसाहेब भेगडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, नगरसेवक मयूर कलाटे, राजू मिसाळ, जय पवार, निहाल पानसरे, वर्षा जगताप, शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.










