- महाआघाडीचे पार्थ पवार आणि महायुतीचे श्रीरंग बारणे आमने सामने
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करून जात असताना महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले. हा क्षण बघण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर ते जात असताना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे अर्ज भरण्यासाठी येत होते.
त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले. प्रतिस्पर्धी उमेदवार असताना देखील पार्थ पवार यांनी स्वतःहून बारणे यांच्याकडे जात हस्तांदोलन केले त्यामुळे पार्थ पवार यांच्या या खिलाडू वृत्तीचे कौतुक होत आहे.










